रोज चांगली बुध्दी दे

 रोज चांगली बुध्दी दे


रोज चांगली बुध्दी दे, सांगतो आपण ज्याला,

सांग ना गं आई, कुणी पाहिलय त्या देवाला,

 

दूर दूर पलीकडे ढगांच्याही वर,

खरंच का ग असेल तिथे देवबाप्पाचे घर,

तेही चांदण्याच्या अंगणात येतो का खेळायला,

सांग ना गं आई, कुणी पाहिलय त्या देवाला,

 


त्याला सुध्दा रोज शाळेत जावे लागत का गं,

आमच्या सारखं मोठं दप्तर न्याव लागत का गं,

दरवर्षी पास व्हावं लागतं का गं त्याला,

सांग ना गं आई, कुणी पाहिलय त्या देवाला,


आमच्यासारखे खेळ कधी तोही खेळतो का गं,

खेळांमध्ये दोस्तासंगे तो ही भांडतो का गं,

कपडे मळले म्हणूनी कोणी ओरडतात का त्याला,

सांग ना गं आई, कुणी पाहिलयं त्या देवाला,


 त्याला सुध्दा असेल का गं,

तुझ्यासारखी आई,

झोप नाही आली तर गाते का अंगाई,

ताई, दादा, बाबा सुद्धा  असतील का गं त्याला,

सांग ना गं आई, कुणी पाहिलयं त्या देवाला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा